होर्टीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

संजय रेणुके /जळकोट:
सध्या सर्वत्र शालेय जीवनातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विविध गावात, शहरात घेतला जात आहे. त्यामध्ये जवळपास 60 वर्षे वयाच्या पुढील विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या शाळेमध्ये तत्कालीन गुरुजनांच्या सहवासात रममान होऊन आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहेच, शिवाय तब्बल ६० ते ७० वर्षे वयाच्या पुढील आपल्या वर्गमित्रांना व मैत्रिणींना भेटून अवर्णनीय आनंद घेतला जात आहे. ज्या शाळेत आपण प्राथमिक शिक्षणाचे धडे घेऊन घडलो, त्या शाळेविषयी असलेली आपुलकी ते विद्यामंदिर आजही आदर्शवत असल्याची भावना व्यक्त करून सर्वांच्या सहभागातून शाळेत एखादी वस्तू भेट देणे, विद्यमान विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू म्हणजे डिजिटल टीव्ही, संगणक, खेळाचे साहित्य, इमारत बांधकाम करून देणे इत्यादी अनेक वस्तू भेट देऊन अल्प का होईना शाळेच्या, गुरुजनांच्या आणि आपल्या गावाच्या ऋणातून उतराई होण्याचे प्रयत्न संबंधित विद्यार्थी करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण महर्षी माजी आमदार दिवंगत सि.ना. आलुरे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण घेऊन गेलेल्या सर्वच बॅचच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि तत्कालीन गुरुजनांचा स्नेह मेळावा दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी तुळजापूर तालुक्यातील जळकोटपासून जवळच असलेल्या होर्टी येथील शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला. प्रारंभी विद्यादेवता सरस्वती आणि शिक्षण महर्षी आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवर अतिथींचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक उपासे यांनी केले. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक चिलोबा, शिक्षक सुलतानपुरे आदी गुरुजनांचा यथोचित सत्कार करून तुमच्या मार्गदर्शनात आम्ही घडलो अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून बोलून दाखवली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अणदुर नगरीचे सरपंच तथा शिक्षण महर्षी आलुरे गुरुजींचे वारसदार रामचंद्र आलुरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सिद्रामप्पा खराडे, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी एन. के. साहेब, उपसरपंच अशोक राजमाने, ग्रामपंचायत सदस्य संजीव गुंजीटे, सोसायटीचे चेअरमन गणेश खराडे, सुरेश राजमाने, दत्ता राजमाने, गोविंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी म्हणून पोपट गायकवाड, प्रा. उद्धव घोडके, ज्ञानेश्वर भोसले, यांचा सत्कार करण्यात आला. तर सदर शाळेचे माजी विद्यार्थी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी, प्रा. डॉ. उद्धव घोडके, आय. आय. टी. दिल्ली येथून निवृत्त झालेल्या सौ. मिरा भोसले, इंजिनियर सोमनाथ राजमाने, महाराष्ट्र केसरी साठी निवड झालेले कुमार मयूर भोसले, पूनम गंगाराम भोसले, आश्विनी राजमाने, ज्ञानेश्वर घोडके, राजेश कानडे, एकनाथ बिराजदार, धनराज भोसले आदी तत्कालीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सिद्रामाप्पा खराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप रामचंद्र आलुरे यांनी केले. प्रास्ताविक हनुमंत गिरी यांनी सूत्रसंचालन प्रदीप तरमोडे गुरुजी यांनी आभार नवगिरे बी. बी. यांनी मानले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी के. एम. कोरडे, योगेश खराडे, प्रा. सोमेश्वर राजमाने, मनोहर घोडके आदींनी परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांना अल्पोपहाराचे आयोजन केले होते. स्नेहमेळाव्यास विद्यमान शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

