
लोहारा (जि. धाराशिव): शहरासह तालुक्यातील अनेक भागात शनिवारी (ता. २०) दुपारी विजांच्या कडकडासह तब्बल दीड तास जोरदार अवकाळी पाऊस झाला. शहरातील रस्त्यावरून पाणी वाहते झाले. ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. दुपारी पावने तीनला सुरू झालेला पाऊस सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरूच होता. दरम्यान, तालुक्यातील कानेगाव, माळेगाव व भोसगा येथे वीज पडून ६ जनावरे मृत्यूमुखी पडले.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. आठ दिवसापूर्वी तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला. दोन दिवस ढगाळ वातावरण होते. परंतु, त्यानंतर ता. १२ ते १७ एप्रिलदरम्यान पुन्हा उष्णतेची लाट निर्माण झाल्याने शहराच्या उष्णतेचा पार ४१ अंशावर पोहचला. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. दरम्यान, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचनाक वातावरणात बदल होत वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर पावने तीन वाजता विजांच्या कडकडासह पावसास सुरवात झाली. प्रारंभी काही मिनीटे वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस झाला. त्यानंतर मात्र, वादळी वारे थांबताच पावसाने चांगलाच जोर धरला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ विजांचे नृत्य तांडव सुरू होते. सतत कानठळ्या बसविणारा आवाज येत असल्याने अबालवृध्दांमध्ये भितीचे वातावरण होते. दरम्यान, तालक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून सहा जनावरे दगावली आहेत. कानेगाव येथील पशुपालक शेतकरी पांडूरंग जनार्धन लोभे यांनी लिंबाच्या झाडाखाली तीन म्हशी व एका वासरू बांधले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास लिंबाच्या झाडावर वीज कोसळून चारही जनावरे दगावली. दुभत्या म्हशी दगावल्याने पशुपालक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. माळेगाव येथील शेतकरी सुभाष राम कुंभार यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडली. तर भोसगा येथे वीज पडून शेतकरी अशोक विठ्ठल कागे यांची गाय दगावली आहे. रब्बी हंगामातील काही पिकांची अद्याप काढणी झालेली नाही. आज झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीस आलेल्या ज्वारी, करडई पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष बागांनाही पावसाचा फटका बसला आहे. तब्बल दीड तास पाऊस झाल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. महिन्याभरांपासून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

