अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; लोहारा शहरातील घटना

लोहारा (जि. धाराशिव): खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात शुक्रवारी (दि. १६) घडली. या घटनेमुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक करून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारा शहरातील गारठे हास्पिटल जवळील शेजारी असलेल्या खोलीत पदवीधर डीएड अलेला ३३ वर्षीय शिक्षक आठवी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांची गणित विषयाची खासगी शिकवणी घेतो. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे शिकवणीचा वर्ग संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर हाकलून शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गात एकटीलाच थांबवून घेतले. चाचणी परीक्षेत कॉपी का केली, असे धमकावत पीडितेच्या हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिच्याशी अश्लील चाळे करून तीचा विनयभंग केला. पीडित मुलीने घरी गेल्यानंतर नराधम शिक्षकाने आपल्यासोबत केलेल्या गैरवर्तनाची माहिती आई-वडिलांना दिली. पीडित मुलीने लोहारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरूध्द शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
आरोपी शिक्षक गेली दहा ते बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेतो. मागील काही वर्षांपूर्वी या नराधम शिक्षकाने शिकवणीला येणाऱ्या काही मुलींचा विनयभंग केला होता. परंतु, मुलीची व कुटुंबांची बदनामी होईल, या भीतीपोटी पोलिसांत तक्रार दाखल करण्याच धाडस कोणी करत नव्हते. शिवाय काही स्थानिकांनी त्यावेळी मध्यस्ती करून प्रकरण मिटविले होते. शुक्रवारी झालेल्या प्रकरणातही शहरातील काही तथाकथीत पुढाऱ्यांनी आरोपीला पाठीशी घालण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने खंबीर भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्याने शिक्षक गजाआड झाला.
…….




