संत मारूती महाराज पालखी सोहळ्यात भक्तांची मांदियाळी

लोहारा (जि. धाराशिव): प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कानेगाव येथे श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांची २७ व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्ताने नगरप्रदक्षिणा व पालखी सोहळा शनिवारी २३ सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये पार पडला. सकाळपासूनच कानेगाव येथे भाविकांनी संत मारूतीमहाराज यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील विविध ठिकाणाहून निघालेली भक्तगण दिंडी संत मारूती महाराज यांचा जय घोष व विठ्ठलाचे नामस्मरण करीत कानेगाव नगरीत सकाळी पोचली. सकाळी नऊ वाजता ह.भ.प श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली नगरप्रदक्षिणा सोहळा सुरु होऊन त्याची सांगता सायंकाळी झाली. पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. धनगरी ढोल, वारुवाले, बँजोवाले, वारकरी यांच्यासह मोघा, आर्णी, भातागळी, नागूर, कास्ती, मार्डी, बेंडकाळ, हिप्परगा, धुत्ता, उजनीसह पंचक्रोशीतील भक्तगण, ग्रामस्थ सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सोहळ्यात सहभागी भाविकासाठी गावातील सर्व युवक व ग्रामस्थांनी प्रत्येक चौकामध्ये चहा पाणी नाश्ता, जेवणाची सोय केली होती. धाराशिव येथील साई परिवार ढोल पथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली. आज रविवारी २४ स्पटेंबरपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह चालू होणार असून सात दिवस भजन, कीर्तन, हरिजागर, काकडा आरती होणार असून या सप्ताह सोहळ्याची सांगता ३० सप्टेंबर रोजी काला व महाप्रसादाणे होणार आहे. या सोहळ्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी व कानेगाव ग्रामस्थांनी केले आहे.





