माकणी येथील बीएसएसच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पर्यावरणातील बदलाची माहिती

लोहारा (धाराशिव): तालुक्यातील माकणी येथील बीएसएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रबोधिनी कृषी विद्यालयास (हराळी) भेट देऊन सेंद्रिय शेतीचे फायदे, रेशीम किडी उत्पादन व पर्यावरणामध्ये होत असलेले बदल याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
माकणी येथील बीएसएस महाविद्यालयात ग्रीन क्लबच्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सर्वक्षत्रातील व्यापक ज्ञान मिळावे यासाठी महाविद्यालयाने हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी कृषी विद्यालय व वेध शाळेस भेट दिली. यावेळी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प आणि निर्मिती, रेशीम किडी उत्पादन व पर्यावरणामध्ये होत असलेले बदल याबाबत माहिती घेतली. रासायनिक खतांचा वापर करून निर्मिती केलेल्या अन्नांपासून वेगवेगळ्या आजाराचा धोका कसा निर्माण होतो याची विस्तृत माहिती प्रा.दत्ता बिराजदार यांनी देत सेंद्रिय शेती करण्याबाबत महाविद्यालयीन युवकांनी शेतकऱ्यांत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. विक्रम सूर्यवंशी, प्रा. सुरेश मरगळे यांनी रेशीम कीड व उत्पादन, पर्यावरण व त्यातील होत असलेले बदल, गांडूळ खत प्रकल्य व निर्मिती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी बीएसएस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.व्ही. थोरे, डॉ. संजय बिरादार, डॉ. एस. डी. कांबळे, डॉ. एस. ई. मुंडे, डॉ. व्ही. एन. पंतगे, डॉ. वाय. डी. माने, डॉ. किरण लोमटे, डॉ. अतुल बिराजदार, डॉ. जयपाल सूर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.




