
मुरुम (जि. धाराशिव): येथील जिल्हा परिषद प्रशालातील विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीबद्दल सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. लातूर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहाना दयानंद विभुते हिने सायबर गुन्हे, सोशल मीडिया, मोबाईल ॲप्लिकेशन यातून होणारी अर्थिक फसवणुकीबाबत उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर यातून आपण, आपले कुटुंब व समाज कसे सुरक्षित राहू शकते याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यशाळा प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली गेली होती. विद्यार्थ्यांना मोबाईल फोन, सोशल नेटवर्किंग, वेब साईट वापर यातील समस्या व उपाययोजना याबद्दल यथोचित माहिती मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याधापक विजयकुमार देशमाने, शिक्षक शिवाजी कवाळे , हरिभाऊ माकणे, संतोष कडगंचे, प्रवीण ठाकूर, मोहन राठोड, संगिता माने, संगणक शिक्षिका संगीता घुले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.





