प्रतिभा इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

मुरूम (जि. धाराशिव): येथील प्रतिभा निकेतन इंग्रजी माध्यम शाळेत शनिवार (दि.२४ ) वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न झाला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर विकास शिक्षण मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव उपस्थित होते. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सचिदानंद अंबर, सामाजिक कार्यकर्ते बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, प्रतिभा इंग्रजी शाळेचे प्राचार्य अनुराधा जोशी, पुरुषोत्तम बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, शिक्षणमहर्षी चैतन्यमूर्ती कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता नर्सरी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाळेतील आदर्श विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिक्षकांचा, स्कूल बस चालकांचाही गौरव करण्यात आला. प्रारंभी स्वागत गीताने वार्षिक स्नेह सम्मेलनास सुरवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी,मराठी गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला.




