स्वराज्य संघटना आक्रमक; तालुका क्रीडा संकुलासाठी लोहाऱ्यात रास्ता रोको

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा शहर परिसरातच तालुका क्रीडा संकुल कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने नागरिकांसह गुरूवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. लोहारा शहरासाठी तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. त्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु, शहरासाठी मंजूर झालेले क्रीडा संकुल शहरापासून २५ ते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जेवळी येथे उभारण्याचा घाट घातला आहे. सत्ताधारी पक्षातील काही राजकीय पुढारी त्यासाठी जोरकस प्रयत्न करीत असून क्रीडा संकुलसाठी तीन एक्कर जागा संपादीत करून शहरातील नागरिकांना धक्का दिला आहे. त्यामुळे जेवळी येथे होणाऱ्या क्रीडा संकुलला स्वराज्य संघटनेसह नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. क्रीडा संकुल शहरात अथवा अजूबाजूच्या परिसरात करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे अनेकवेळा केली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आक्रमक झालेल्या स्वराज्य संघटनेने गुरूवारी दुपारी दीड वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून अर्धातास रस्ता रोखून धरला. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना हसुरे, स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे, तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात यांनी मनोगत व्यक्त करून जेवळी येथे होणाऱ्या तालुका क्रीडासंकुलला तीव्र विरोध केला. यावेळी आधुनिक लहुजी शक्ती सेना, फकिरा ब्रिगेड या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला. तानाजी पाटील नितीन मुळे, बापू साळुंखे, नगरसेवक प्रशांत काळे, अनिल मोरे, दादासाहेब रवळे, ओंकार चौगुले, गंगाराम भोंडवे, संजय मुरटे, बालाजी मुळे, सोमनाथ मुळे राजाभाऊ मुळे, शिवाजी लकडे, रमेश जाधव, संजय सोमवंशी यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

