मराठा आरक्षणासाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू

लोहारा (जि. धाराशिव): मराठा समाजाल आरक्षण मिळावे, यासाठी विविध मोर्चे, आंदोलनानंतर मराठा समाजाने आता साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्या अनुषंगाने लोहारा तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून (ता. २५) साखळी उपोषण सुरू केले आहे.
आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षांपासून मराठा समाज सातत्याने मागणी करीत आहेत. लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून सरकारचे लक्षवेधून घेतले. परंतु, राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासन देऊन आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. त्यामुळे आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आहे. श्री. जरांगे यांनी आरक्षण मंजूर करण्यासाठी सरकारला २४ तारखेचा अल्टिमेट दिला होता. परंतु, आरक्षण मंजूर न केल्याने श्री. जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देणयासाठी लोहारा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. यात नगरसेवक प्रशांत काळे, सचिन रणखांब, विशाल गोरे, मंगेश गोरे, अविनाश गोरे, नितीन गोरे, दत्तात्रय घाडगे, अवधूत गोरे, आकाश गोरे, रणजीत चिंचोले, समाधान बिराजदार, ज्ञानेश्वर गोरे, अर्जुन गोरे, अजित बिराजदार, किरण चिंचोले, पांडुरंग कुंभार, चेतनम गोरे, पिंटू गोरे, बाबूराव घाडगे, सहदेव घाडगे, शशिकांत भोंडवे आदी सहभागी झाले आहेत.
..राजकीय नेत्यांना अकरा गावांमध्ये प्रवेश बंदी…
आरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. असे असताना राज्यकर्ते ठोस भूमिका घेत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळाणार नाही, तोपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थ घेत आहेत. तालुक्यातील नागराळ, हिप्परगा, बेंडकाळ, मोघा (बुद्रुक), मोघा (खुर्द), धानुरी, करजगाव, उंडरगाव, लोहारा (खुर्द), खेड, माकणी या अकरा गावातील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे.
………………………..





