सास्तूर येथे दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरास सुरूवात; २२५ दिव्यांगानी केली नोंदणी

लोहारा (जि. धाराशिव): स्पर्श ग्रामीण रुग्णालयाकडून दिली जाणारी आरोग्य सेवा, आयोजित केली जाणारी विविध आरोग्य शिबिरे ही कौटुंबिक सोहळ्या प्रमाणे आहेत. रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे हा मानवतावादी दृष्टीकोन जपण्याचे काम स्पर्श ग्रामीण रूग्णालय करीत असल्याचे गौरवोद्गार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सास्तूर येथे आयोजित दोन दिवसीय दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी काढले. स्पर्श ग्रामीण रुग्णालय, निवासी दिव्यांग शाळा यांच्या वतीने व रोटरी क्लब कॉव्हेंट्री (लंडन), सरस्वती प्रतिष्ठान (मुंबई), प्रशांतराव परिचारक फौंडेशन (पंढरपूर) यांच्या सहकार्यातून सास्तूर येथील स्पर्श रूग्णालयात ७ ते ८ ऑक्टोंबरदरम्यान दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येत आहे. शनिवारी (ता.सात) शिबिराचे उद्घाटन झाले. आदार ज्ञानराज चौगुले अध्यक्षस्थानी होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील. जिल्हा शल्य चिकित्सक इस्माईल मुल्ला, लंडन येथील सर्जन डॉ. जॉन क्लेग, आँर्थोपेडीक सर्जन डॉ. मयुरेश वारके, डॉ. प्रमोद काळे, डॉ हेमांषू बेंद्रे, डॉ दीप्ती ठाकूर, डॉ अविनाश देठे (मुंबई), रोटरी कल्बचे डॉ. लीना धांडे, नंदू शेनोय, परिचारक फौंडेशनचे राहुल पटवर्धन, डॉ. हरी पवार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (बुलढाणा), स्पर्शचे प्रकल्पाधिकारी रमाकात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, सोलापूर गुलबर्गा, बिदर या जिल्ह्यमधून दिव्यांग बालके या शिबिरासाठी आली आहेत आज पहिल्याच दिवशी २२५ बालकांची नोदणी झाली असून त्यांची तपासणी करून यातील बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मुंबई येथील भूलतज्ञ डॉ. प्रमोद काळे यांनी दिव्यांग शिबिरासंबधी तसेच आपल्या बालकांच्या शस्त्रक्रियेनंतर घावयाची काळजी याबद्द्ल माहिती देऊन ० ते १४ वयोगटातील दिव्यांग बालकांच्या टेन्डन व इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया दोन दिवसात केल्या जातील ,असे सांगून शेवटचे बालक संपेपर्यंत शस्त्रक्रिया शिबिरासाठी आम्ही येत राहू, असे आश्वासन दिले. शिवसेनेचे मोहन पणुरे,जगन्नाथ पाटील, फिजियोथेरपिस्ट डॉ मंगेश कुलकर्णी, बालाजी नादरगे, रुग्णालयाचे सर्जन डॉ. मनीष सिन्हा, वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्तराज ठोंबरे, डॉ. अशोक मस्के यांच्यासह नागरिक उपस्थित होते.





