
कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे येथील विद्या मंदिर शाळेतील शिक्षक सचिन जाधव यांना आनंदगंगा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील संजय घोडावत इंस्टिट्यूट अतिग्रे येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थित झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ उपस्थित होते. यावेळी बँकेचे चेअरमन सुनील एडके, फाउंडेशनचे संस्थापक तानाजी पवार, निलेश साळोखे, युवा उद्योजक राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थित होती. शिक्षक सचिन जाधव हे मूळचे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील रहिवाशी आहेत. ते सद्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे येथील विद्या मंदिर शाळेत अद्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. त्यांची विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यगुणवत्ता यादीत आणले आहे. प्रज्ञाशोध, मंथन, टॅलेन्टप्लस यासह विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्यार्थी निर्माण केले आहेत. अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. वृक्षारोपन करणे, मुलींचे शिक्षण, समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणे, अशा कामात सातत्याने पुढाकार घेतात. सचिन जाधव यांनी कोरोना काळात रक्तदान केले असून सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत सात वेळा रक्तदान केले आहे. अशा या ध्येयवेड्या शिक्षकाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.




