राज्य

लोहारा शहरासह अनेक गावे कडकडीत बंद; खेड, हिप्परगा, बेंडकाळ येथे रास्ता रोको

लोहारा (जि. धाराशिव): आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला मंगळवारी लोहारा तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. लोहारा शहरातील बाजारपेठ दिवसभर बद होती. दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून सरकारचाा निषेध केला. तालुक्यातील खेड, हिप्परगा, बेंडकाळ येथे रास्ता रोको आंदोलन केले.
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास सुरू केले आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. मात्र, राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी पुकारलेल्या बंदला लोहारा शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात माकणी, जेवळी, सास्तूर, कानेगाव, सालेगाव, धानुरी, तोरंबा, तावशीगड, खेड, हिप्परगा (रवा), नागूर, भातागळी यासह अन्य गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. दरम्यान, आरक्षणासाठी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत वीस ते पंचवीस टायरांना आग लावून दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. ‘देत कसं नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी नगरसेवक प्रशांत काळे, महेश गोरे, श्रीकांत भरारे, नाना पाटील, नेताजी शिंदे, शहाजी जाधव, प्रकाश भगत, यशवंत चंदनशिवे, दादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
….खेड, हिप्परगा येथे रास्ता रोको आंदोलन…
तालुक्यातील खेड येथील ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास लोहारा-नारंगवाडी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून एक तास रस्ता रोखून धरला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीचे निवेदन आंदोलनस्थळी उपस्थित असलेले पोलिस निरीक्षक अजीत चिंतले यांना दिले. यावेळी महादेव धारूळे, गौतम बेलकुंडे, मारूती पवार, तुळशीदास पवार, यशवंत गरड, बालाजी बेलकुंडे, अभिजीत पवार, पांडुरंग सुरवसे, व्यंकट पाटील, अमर सवार आदी उपस्थित होते. हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनीही आरक्षण मिळावे, यासाठी लोहारा- तुळजापूर जिल्हामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. बेंडकाळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. महेश गोरे, महेश देशमुख, गुणवंत गोरे, सहदेव गोरे, बाळू गोरे, शरद कदम, दत्ता गोरे, तुकाराम कोळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close